Your browser does not support JavaScript!


'मुक्तांगण' हे नाव आज केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला परिचित आहे,अस म्हंटलं तर वावग ठरणार नाही. व्यसनाधीनतेच्या विळख्यातून बाहेर पडून पुन्हा स्वच्छ, सुंदर आयुष्याला कवेत घेण्याचा मार्ग दाखविणाऱ्या 'मुक्तांगण' च्या घडणीचं श्रेय अवचट कुटुंबियांकडे जाते. अनिल अवचट यांनी 'मुक्तांगण'ची कहाणी या पुस्तकातून सांगितले आहे.

डॉ. अनिल अवचट आणि डॉ. सुनंदा अवचट यांच्या प्रयत्नांतून व्यसनमुक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या मुक्तांगण या संस्थेची स्थापना झाली. व्यसनाधीन रुग्ण, त्यांची शारीरिक- मानसिक अवस्था, समाजाचा दृष्टीकोन,व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबाची स्थिती, रुग्णाची बरं होण्याची प्रक्रिया आदीप्रत्येक टप्प्यावर साथ देण्याचं मोठं काम मुक्तांगणनं उभं केलं आहे. या प्रवासाचा मागोवा पुस्तकात वाचायला मिळतो.

मुक्तांगणची गोष्ट:’ ‘मुक्तांगण’ला देणगी देतेवेळी पु.ल. म्हणाले होते, ‘एका जरी घरात व्यसनमुक्तीचा दिवा लागला, तर माझ्या देणगीचे सार्थक झाले, असे मी समजेन.’ पु.लं. तसे माझे वडीलच. त्यांचे अनुकरण करून म्हणावेसे वाटते, की हे पुस्तक वाचून व्यसनाच्या अंधारात चाचपडणारया एका जरी व्यसनीला बाहेर यायचा प्रकाशाचा ठिपका दिसेल, तर सार्थक झाले समजेन.

व्यसनी नवऱ्याच्या एका जरी पत्नीला पूर्वीच्या जखमा विसरून चांगले आणि आत्मविश्वासाने जगावेसे वाटले, की त्याहून काय हवे? एका जरी व्यसनी बापाच्या लहानग्या पोराच्या मनावरचे काळेकुट्ट मळभ दूर होऊन छानसे कोवळे उन्ह पसरेल, आणि त्यात ते पोर मस्त, अनिर्बंध नाचेल...त्यापेक्षा अधिक काय मिळवायचे असते?